
राहुल कराड - सरपंचांना आवाहन

डॉ. राहुल कराड
सुशिक्षित तरुणांनी राजकारणात यावे आणि राजकीय नेते बनून देशाची आणि समाजाची सेवा करावी या हेतूने २००५ साली एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट ची स्थापना करण्यात आली. सुशिक्षित तरुण राजकारणात येऊन सकारात्मक बदल धडवतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.
ह्याचाच पुढचा भाग म्हणजे २०११ साली सुरु झालेली भारतीय छात्र संसद, जी आज देशातील हजारो तरुणांसाठी भारतातील सर्वात मोठे व्यासपीठ बनले आहे. त्याद्वारे हजारो तरुणांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सहभागी होऊन भारतीय लोकशाही अजून बळकट करण्यास सुरवात केली आहे.
यानंतर नॅशनल टीचर्स काँग्रेस (NTC: २०१६) आणि नॅशनल वूमन्स पार्लमेंट (NWP: २०१७) याची सुरवात करण्यात आली. NTC चा प्रमुख उद्देश संपूर्ण देशातील उच्च शिक्षणातील शिक्षकांना प्रोत्साहित करणे हा असून, NWP चा प्रमुख उद्देश हा राजकारण, शिक्षण, क्रीडा, साहित्य, कला, उद्योग, संस्कृती, समाजकारण, अर्थकारण आणि न्यायव्यवस्था अशा अनेक क्षेत्रात महिलांनी केलेल्या दैदिप्यमान कामगिरीचे कौतुक करणे आणि त्यांना प्रोत्साहित करणे आहे.
सरपंच संसदेची सुरवात २०१७ साली सरपंच हा केंद्रबिंदू मानून करण्यात आली. ३ दिवसीय सरपंच संसदेमध्ये सरकारी योजना, तंत्रज्ञान, पाणियाचे नियोजन, आरोग्य, CSR आणि विकास अशा अनेक विषयांचा समावेश करण्यात आला असून सुमारे १०,००० सरपंच दरवर्षी ह्यात सहभागी व्हावेत, अशी संकल्पना आहे. महात्मा गांधींच्या स्वप्नांतले आदर्श ग्राम प्रत्येक तालुक्यात विकसित करणे, आणि त्यासाठी लागणारे व्यासपीठ उपलब्ध करण्याचे काम सरपंच संसद करीत आहे. सरपंच संसदेच्या माध्यमातून प्रोत्साहित झालेले आदर्श सरपंच राजकारणात आणि समाजकारणात नेतृत्व करतील, असा आमचा विश्वास आहे.












